Pre-wedding shoot (Photo Credits: Instagram/reload.entertainment)

मध्य प्रदेशच्या भोपालमध्ये (Madhya Pradesh) विवाहपूर्व शूटवर (Pre wedding Shoot) जैन, गुजराती आणि सिंधी समाजाने बंदी घातली आहे. इतकेच नाही तर लग्नातील कोरिओग्राफीवरदेखील बंदी घातली गेली आहे. या समाजाचा असा विश्वास आहे की, लग्न सारख्या गोष्टीला संस्मरणीय बनविण्यासाठी लोक अशा गोष्टी करतात, परंतु लग्नाआधी जेव्हा संबंध तुटतात तेव्हा संपूर्ण कुटूंबाला एका विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागते. तसेच अशा गोष्टी त्यांच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. यासाठी एक परिपत्रक काढले गेले असून, ते मान्य न केल्यास सामाजिक बहिष्कार टाकण्याचीही धमकी देण्यात आली आहे.

विवाहपूर्व शूटसोबत मिरवणुकीत महिलांच्या नृत्यावर बंदी घालण्याचा विचार जैन समाजाकडून केला जात आहे. याबाबत बोलताना, गुजराती समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय पटेल म्हणाले, ‘लग्नात कोरिओग्राफी करून बसवलेल्या नृत्याऐवजी पारंपरिक नृत्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे कार्यकारीने ही परंपरा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.’ लग्नापूर्वी फोटो काढणेदेखील चुकीचे असल्याचे या समाजाने म्हटले आहे. श्रीमंत लोकांना हा खर्च परवडू शकतो, मात्र मध्यमवर्गीय लोकांसाठी ही मोठी समस्या आहे. तसेच लग्नाआधीच जर का साखरपुडादेखील तुटला तर त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यामुळे लग्नापूर्वी शुटींग करायची गरज नाही. (हेही वाचा: प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान Kiss करताना कपल नदीत पडलं (Viral Video))

जैन समाजाच्या धार्मिक गुरूंनी त्यांच्या प्रवचनांमध्ये, प्री-वेडिंग फोटोशूट्स आणि कोरिओग्राफीयावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जैन समाजानेही या दोन्ही गोष्टींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच भोपाल सिंधी समाजही अशाप्रकारचा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनीही या गोष्टीचे समर्थन केले आहे.