File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

कर्नाटक, केरळसह देशाच्या बर्‍याच भागात काल आणि आज चंद्र दिसल्याने रमजानचा (Ramazan) पवित्र महिना सुरू झाला आहे. शनिवारपासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु होतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रमजानसाठी देशवासियांना आणि विशेषतः मुस्लिम समाजातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी रमजानच्या शुभेच्छासोबत कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत विजयी होण्याची आशा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार नवव्या महिन्याला महिना-ए-रमजान म्हणतात. इस्लाममध्ये रमजानचा पाक महिना देवाची उपासना करण्यासाठी खूप महत्वाचा मानला आहे.

पीएम नरेंद्र मोदी ट्विट -

पीएम नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘रमझान मुबारक! मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना आपल्याबरोबर दया आणि करुणा घेऊन येवो. कोरोना व्हायरस विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत आपण निर्णायक विजय मिळवू आणि आरोग्यदायी जगाची निर्मिती करू अशी आशा मी व्यक्त करतो.'

यंदा कोरोना संकटामुळे जगभरातील लोकांना त्यांच्या घरीच प्रार्थना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुस्लिम धर्मगुरूंनीही भारतात असेच आवाहन केले आहे. सोबत केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही मुस्लिमांना रमजानच्या काळात लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या आधी जामा मशिदीला दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस पीआरओ रंधावा यांनीही सर्व दिल्लीकरांना आवाहन करून रोजा आणि नमाजच्या वेळी घराबाहेर पडू नका व लॉक डाऊनचे उल्लंघन करू नका असे सांगितले आहे. (हेही वाचा: Coronavirus In India: कधी संपणार भारतामधील कोरोना व्हायरसचे संकट? जाणून घ्या काय म्हणतो आरोग्य मंत्रालय आणि PIB ने जाहीर केलेला अहवाल)

दरम्यान, या पवित्र महिन्यात इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक नियमितपणे नमाज अदा करतात, संपूर्ण महिनाभर रोजा म्हणजेच उपवास ठेवतात व रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘ईद’ साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक ठिकाणी मस्जिदमध्ये सामुहिक नमाज होणार नाही.