Boy Explaining Social Distancing (Photo Credits: Video Screengrab/ @pratapsomvanshi/ Twitter)

चीन देशाच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. दिवसागणित तीव्र होत जाणाऱ्या या संकटाचा सामना अनेक देश करत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. तसंच कोरोना विषाणूच्या संसर्गावर कोणतेही ठोस औषधं, लस उपलब्ध नसल्याने घरात राहणे आणि सोशल डिस्टेसिंगचे पालन करणे हाच एक उपाय आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यास यश येईल. त्यामुळेच सोशल डिस्टेसिंगचे महत्त्व अनेक आरोग्य तज्ज्ञांसह नेते मंडळी, सेलिब्रिटी, क्रीडापटूंनी समजावून सांगितले आहे. तर आता एक नवीन व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. यात मुलांनी खेळा खेळात कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी तोडण्याचा संदेश दिला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, "कोरोना पासून वाचण्याचा संदेश मुलांनी खेळता खेळता दिला आहे." या व्हिडिओत मुलांनी विटांनी एक गोलाकार वर्तुळ तयार केले आहे आणि एक कोरोना बाधित हा आजार इतरांपर्यंत कसा पोहचवतो हे सांगितले आहे. तसंच ही साखळी तोडायची असल्याचं काय करावे, हे ही समजावून सांगितले आहे. सोशल डिस्टेसिंगचे पालन केल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग कसा टाळू शकतो असा संदेश यातून देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

कोरोना विषाणूंचा फैलाव भारत देशात वेगाने होत आहे. दिवसागणित कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 12000 च्या पार गेला असून 414 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाचा देशातील वाढता धोका लक्षात घेत लाकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांसह सोशल डिस्टेसिंगचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.