पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज कर्नाटक दौर्यावर आहेत. दरम्यान तुमकूर (Tumkur) येथे आज मोदींच्या हस्ते पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या योजने अंतर्गत देशातील लाखो शेतकर्यांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे सुमारे 6 कोटी शेतकर्यांच्या बॅंक खात्यामध्ये मदत मिळणार आहे. आज 12 हजार कोटींची रक्कम थेट बॅंकेत जमा होणार आहे. या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी आधार कार्ड बॅंक खात्यासोबत संलग्न करणं आवश्यक आहे.
दरम्यान मोदी आज आणि उद्या कर्नाटक दौर्यावर आहेत. आज ते तुमकूरमध्ये सिद्धगंगा मठ मध्ये नियोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा, श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी जनतेची संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान किसान योजनेबद्दल महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
दरम्यान 29 डिसेंबर पर्यंत शेतकर्यांना आधारकार्ड लिंक करण्याची सोय देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे 9.2 कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारला मिळाली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील 45 हजार कोटींचे वाटप झाले असून आज उर्वरित 12 हजार कोटींचे वाटप करण्यात येणार आहे.