वृद्धाश्रमातील वृद्ध (फोटो क्रेडिट्स: ANI)

तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमधील एका गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी येथील वृद्धाश्रमात (Old-Age Home) वृद्ध लोकांचा अमानुष छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना एका खोलीत डांबून ठेवले गेले होते. इतकेच नाही तर या लोकांना साखळदंडाने बांधले होते. या जेष्ठ नागरिकांचा आरडा ओरडा ऐकून शेजाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 जणांना एका खोलीत डांबून ठेवले होते आणि त्यांची आता सुटका करण्यात आली आहे. ज्यांनी आपले पालक तिथे ठेवले आहेत, त्यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ममता वृद्धाश्रम' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रवर्तक वृद्धाश्रमातच अनधिकृतपणे मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र चालवित होते.

ही घटना हैदराबादमधील नारगम गावातील आहे, जिथे वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आश्रमातील एका खोलीत बंद असलेल्या 73 जणांना मुक्त करण्यात आले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. हे सर्व लोक मानसिक आजारी किंवा मनोरुग्ण आहेत आणि आश्रमात त्यांना बेड्या घालून ठेवण्यात आले होते. (हेही वाचा: केरळमधील शासकीय वृद्धाश्रमातील 60 वर्षीय वृद्ध जोडप्याने केला विवाह!)

जेव्हा वृद्धाश्रमात कैद झालेल्या लोकांची ओरड शेजार्‍यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी त्याबद्दल तक्रार केली. या प्रकरणात वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक रतन जॉन पॉल, के भारती आणि अन्य तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व लोक दोन घरांमध्ये वृद्धाश्रम चालवत होते. याबाबत पालक नागरिक अधिनियम 2007 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात, मेंटेनन्स वेल्फेअर वरिष्ठ नागरिक कायदा 2007 पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.