लुधियानाच्या लखपती भजीवाल्यापेक्षाही श्रीमंत आहे पटियालाचा 'हा' भेळवाला ; इतकी आहे संपत्ती
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: The Alternative)

काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने लुधियानातील 'पन्नासिंग पकोडावाला' या प्रसिद्ध पकोडा केंद्रावर छापा घातल्यानंतर त्याचे वार्षिक उत्पन्न 60 लाख रुपये असल्याचे निर्दशनास आले. ही घटना ताजी असतानाच अजून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पटियालातील भेळवाला तर या पकोडावाल्यापेक्षाही श्रीमंत असल्याचे उघड झाले आहे. आयकर विभागाने छापा घातल्यावर हा प्रसिद्ध भेळवाला करोडपती असल्याचे समोर आले. या भेळवाल्याची संपत्ती तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी आहे.आयकर विभागानुसार, या व्यक्तीला सुमारे 52 लाखांचा टॅक्स भरावा लागणार आहे.

आयकर विभागाने चाट, भेळवाले असलेल्या परिसरात छापे घालण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस भेळवाल्याने तब्बल 1 कोटी 20 लाखांची संपत्ती लपवून ठेवल्याचे उघड झाले. हा भेळवाला कॅटरर्सचेही काम करतो. इतकंच नाही तर गेल्या दोन वर्षांपासून त्याने टॅक्स रिटर्न फाईल केलेला नाही.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भेळवाल्याने दोन पार्टी हॉल बांधले आहेत. तसेच एका समारंभासाठी तो सुमारे 2.5 ते 3 लाख इतका चार्ज करतो. आयकर अधिकाऱ्यांच्या मते, भेळवाल्याच्या टॅक्सची रक्कम अजून वाढू शकते. कारण त्याच्या व्यवसायांची कोणतीही लेखी माहिती उपलब्ध नाही. लवकरच या भेळवाल्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आयकर विभागाने दिली आहे.