चीन (China) मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे जवळपास संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. सर्व देश यासाठी औषधे आणि लस शोधत आहेत, मात्र अद्याप यावरील ठोस उपचार सापडले नाहीत. कोरोना विषाणूबद्दल चारही बाजूंकडून सतत नकारात्मक बातम्या येत असताना भारतामध्ये एक आशेचा किरण दिसला आहे. भारतातील पतंजलि (Patanjali) योगपीठने असा दावा केला आहे की, त्यांना कोरोना विषाणूचा खात्रीशीर इलाज सापडला आहे. हरिद्वार येथील पतंजली योगपीठने सांगितले आहे की, आयुर्वेदिक औषधांद्वारे करोना विषाणूचा आजार 100% बरा होऊ शकतो. तसेच या औषधांना त्याचा संसर्ग रोखण्यासाठी लस म्हणून देखील वापर केला जाऊ शकतो.
पतंजलि योगपीठाचे आयुर्वेद आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) म्हणाले की, पतंजलि संशोधन संस्थेत तीन महिन्यांच्या संशोधनानंतर आणि उंदरांवर केलेल्या अनेक यशस्वी चाचणीनंतर हा कोरोना विषाणूच्या उपचाराचा निष्कर्ष समोर आला आहे. बाळकृष्णांच्या मते अश्वगंधा, गिलोय, तुळस आणि स्वासारि रस योग्य प्रमाणात सेवन केल्यास कोरोना संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी होते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या 150 हून अधिक वनस्पतींच्या 1550 कंपाऊंडवर दिवसरात्र संशोधन करून, 12 हून अधिक संशोधकांनी हे यश संपादन केले आहे. (हेही वाचा: स्वसंरक्षण ड्रेस खरेदीसाठीचा 50 लाखाचा निधी रुग्णालय प्रशासनाने PM Cares फंड कडे वळवला; AIIMS हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा मोठा आरोप)
पतंजलिच्या संशोधनाचा पेपर अमेरिकन जर्नल ऑफ व्हायरोलॉजी रिसर्च मेडिकलमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठविला गेला होता, तो आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ बायोमेडिसिन फार्माकोथेरपीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. पतंजलि संशोधन संस्थेचे प्रमुख व उपाध्यक्ष डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या उपचाराची संपूर्ण पद्धत ही महर्षि चरक यांच्या 'चरक संहिता' या प्रसिद्ध ग्रंथावर आणि आचार्य बालकृष्ण यांच्या सध्याच्या प्रयोगांवर आणि विचारांवर आधारित आहे. दरम्यान याआधी भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी एचआयव्ही संदर्भातील औषधांचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. मात्र आता पतंजलिने दावा केलेल्या औषधांना मान्यता मिळाल्यास भारतासाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.