Arrested | (File Image)

संसद सुरक्षा भंग (Parliament Security Breach) प्रकरणी देशभर वातावरण तापले आहे. संसदेतही विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर त्याची परिणीती खासदारांच्या निलंबनात झाली. दरम्यान, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) कर्नाटक येथून साई कृष्णा नामक तरुणास ताब्यात घेतले आहे. जो बागलकोट येथील निवृत्त पोलीस उपअधीक्षकाचा मुलगा असून तो पेशाने तंत्रज्ञ आहे. हा तरुण संसदेत घुसणाऱ्या तरुणाच्या संपर्कात होता असा आरोप आहे. संसदेत घुसखोरी करणारा आरोपी मनोरंजन डी आणि साई कृष्णा हे दोघे वर्गमित्र आहेत. दोघेही बेंगळुरूच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बॅचमेट होते. साई कृष्णाला त्याच्या बागलकोट येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले असून सध्या त्याला चौकशीसाठी राष्ट्रीय राजधानीत नेले जात आहे.

अधिक माहिती अशी की, बेंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मनोरंजन याचा बॅचमेट साई कृष्णा सध्या घरुन काम (वर्क फ्रॉम होम) करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या बागलकोट येथील घरातून काल रात्री 10 वाजता ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी राजधानीत नेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव अतुल कुलश्रेष्ठ असे असून तो उत्तर प्रदेशातील जालौनचा आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अतुल, ज्याला 'बच्चा' म्हणूनही ओळखले जाते, त्याचे पूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीत आणि कोणताही राजकीय संबंध नाही. परंतू, त्याला विद्यार्थी जीवनापासूनच शहीद भगतसिंग यांच्या विचारसरणीबद्दल आकर्षण होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अतुल संसदेतील घुसखोरांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत होता, त्यामुळे पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. भगतसिंग फॅन्स क्लबशी संबंधित असलेल्या अतुलने सभा आयोजित करण्यात आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.

दरम्यान, अतुल कुलश्रेष्ठ याच्या कुटुंबाशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या कुटुंबाला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. ज्यामध्ये अतुलचा समावेश आहे. अतुलची यापूर्वी कोणतीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची राहिली नाही, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

संसद सुरक्षा भंग प्रकरणात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, मनोरंजन आणि साई कृष्णासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मनोरंजनसह चार आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा, बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सागर शर्मा, अमोल शिंदे, नीलम आझाद, ललित झा (कथित सूत्रधार), महेश कुमावत (झा याला मदत केल्याचा आरोप) यांचाही समावेश आहे. घुसखोरांनी मणिपूरमधील अशांतता, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीचा दावा केला आहे. तथापि, पोलीस सुरक्षेच्या उल्लंघनाशी संबंधित सर्व बाजूंचा शोध घेत, तपास करत आहेत.