PAN Card Misuse: महाविद्यालयीन युवकास आयकर विभागाकडून 46 कोटी रुपयांची Tax Notice; पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचा विद्यार्थ्याचा दावा
Income Tax Department | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल 46 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्यामुळे या तरुणास आयकर विभागाने (Income Tax Department) 46 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. धक्कादायक म्हणजे हा तरुण केवळ 25 वर्षांचा आहे. प्रमोद कुमार दंडोतिया असे त्याचे नाव असून, तो मूळचा ग्वाल्हेर (Gwalior) येथील राहणारा आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील या तरुणास आयकर नोटीस येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरुणाने मात्र, या व्यवहारांशी आपला काहीच संबंध नाही. कोणीतरी आपल्या पॅन कार्डचा (PAN Card Misuse) चुकीचा वापर केला असावा असा या तरुणाचा दावा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत बँक खात्यावरुन झालेल्या व्यवहारांबाबत तरुणाने पोलीस तक्रार केली आहे.

प्रमोद दंतोडिया यास आपल्या बँक खात्यावरुन झालेल्या एकण व्यवहारांबाबत कोणतीही माहिती नव्हती. मात्र, जेव्हा त्याला आयकर विभागाची नोटीस आली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसमध्ये चुकवलेला कर आणि त्यावरील GST भरण्यासंंबंधी सांगण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे पुढे आलेल्या माहितीनुसार, या तरुणाच्या नावे असलेले पॅन कार्ड वापरुन चक्क एक कंपनीही स्थापन करण्यात आली आहे. जी मुंबई आणि दिल्ली येथून सन 2021 चालवली जात आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Income Tax Demand Update: केंद्र सरकारची 1 लाख रुपयापर्यंतची करमाफी, 1 कोटी करदात्यांना दिलासा)

प्रमोद दंतोडिया याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी एक महाविद्यालयीन युवक आहे. मला आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर अशी काही कंपनी आपले पॅनकार्ड वापरुन सुरु असल्याची माहिती आपल्याला मिळाली. ही कंपनी मुंबई आणि दिल्ली येथे सन 2021 पासून सुरु असल्याचेही आपल्याला या नोटीसद्वारेच समजले असे सांगतानाच आपल्या पॅन कार्डचा चुकीचा वापर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी केला असावा, असा दावाही या तरुणाने केला आहे. (हेही वाचा, GST Fraud: 175.93 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूक प्रकरणात विक्रीकर अधिकारी आणि व्यापाऱ्यांवग गुन्हा दाखल; ACB कडून कारवाई)

तरुणाने पुढे बोलताना सांगितले की, आपणास आयकर विभागाची नोटीस मिळताच आपण तातडीने संबंधीत विभागाचे कार्यालय गाठले आणि चर्चा केली. आलेली नोटीस आणि घडलेला प्रकार याबाबत आपण पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शुक्रवारी (29 मार्च) पुन्हा एकदा आपण अतिरीक्त पोलीस अधिक्षकांच्या कार्यालाला भेट दिली आणि तक्रार केली, असे प्रमोद दंतोडीया सांगतो.

दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधिक्षक (ASP) शियाझ के एम यांनी वृत्तसंस्ता एएनआयशी बोलताना सांगितले की, पीडित तरुणाने दिलेली तक्रार आणि निवेदन आम्हास प्राप्त झाले आहे. तरुणाच्या बँक खात्यावरुन तब्बल 46 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्याच्या बँक खात्यावरुन झालेल्या व्यवहारांच्या तपासणीसाठी आम्ही विविध कागदपत्रे पडताळत आहोत. आपल्या पॅन कार्डचा चुकीचा वापर करण्यात आल्याचा तरुणाचा दावा आहे. एकूण रक्कम पाहता संबधित कंपनीकडून तरुणाच्या बँक खात्यावरुन मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तांतरीत करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचाच आता तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.