जम्मू काश्मीर मधील कठुआ परिसरात आढळलेल्या पाकिस्तानी ड्रोनमधून अनेक शस्त्रात्रं जप्त; मोठा हल्ला करण्याचा मानस- BSF
Pakistani spy drone was shot down by Border Security Force (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीरच्या (Jammu & Kashmir) कठुआ (Kathua) तालुक्यातील पन्सार (Pansar) भागात आज (20 जून) पहाटे 5.10 वाजताच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाकडून (Border Security Force) पाकिस्तानी स्पाय ड्रोन (Pakistani Spy Drone) उडवण्यात आले. या ड्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आढळून आली आहेत. यावरुन काहीतरी मोठा घातपात घडवण्याचा उद्देश असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे इंस्पेक्टर जनरल (BSF Inspector General) एन. एस. जामवाल (NS Jamwal) यांनी सांगितले. तसंच हा ड्रोन पाकिस्तानकडून आला आहे, यात कोणतीही शंका नाही, असेही ते म्हणाले.

BSF जम्मू फ्रंटइअरचे इंस्पेक्टर जनरल एन. एस. जामवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ड्रोनमधून M-4 युएस-मेड सेमी ऑटोमेटीक रायफल, 60 गोळ्या, 2 मॅगझिन्स आणि 7 M67 ग्रेनेड्स सापडले आहेत." तसंच या ड्रोनचे वजन 17.5 किलो असून त्यातील शस्त्रास्त्र तब्बल 5-6 किलो वजनाची आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ANI Tweet:

BSF च्या पॅट्रोलिंग टीमला कठुआ मधील हिरानगर सेक्टरमध्ये एक ड्रोन उडताना दिसला. BSF च्या जवानांकडून ड्रोन उडवण्यात आला त्यानंतर तो ड्रोन शेतात जावून पडला. कठुआ पोलिस कंट्रोल रुममधून मिळालेल्या माहितीनुसार, एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये हिरानगर सेक्टरमध्ये पहाटे 5.10 वाजताच्या सुमारास दिसून आला आणि बीएसएफच्या जवानांनी त्याला उडवले. हा ड्रोन अलीभाई नामक व्यक्तीसाठी पाठवण्यात आल्याचे ड्रोनमध्ये नमूद केले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनच्या ब्लेड्सची रुंदी 8 फूट इतकी मोठी होती. तसंच पान्सर पोस्टच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी पोस्टमधून हा ड्रोन नियंत्रित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.