भारताविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाही याची पाकिस्तानला पूर्ण कल्पना - लष्करप्रमुख बिपिन रावत
लष्करप्रमुख बिपिन रावत (फाईल फोटो) (Photo Credits: PTI)

"भारताविरोधी कारवायांविरुद्ध आपण यशस्वी होऊ शकत नाही हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना दहशतवादासारखा दुसरा मार्ग अवलंबावा लागत आहे," असे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे. 27 ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना लष्करप्रमुख रावत म्हणाले की, "पाकिस्तान सतत आतंकवादी कारवाया करत आहे. पण आतंक पसरवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. पाकिस्तान काश्मीरच्या विकास रोखू इच्छित आहे. पण त्यांची ही इच्छा भारत सरकार आणि सेना कधीच पूर्ण होऊ देणार नाही."

पुढे ते म्हणाले की, "पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत." पाकिस्तानने या कुरापती बंद न केल्यास त्यांचेच नुकसान होईल, असा इशाराही त्यांना यावेळी दिला.

"दगडफेकीत एका जवानाने आपला जीव गमावला. मात्र दगड फेकणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नये," असे काही लोकांचे मत असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली."