आज मोठ्या थाटामाटात महात्मा गांधी यांची 150 जयंती (Birth Anniversary of Mohandas Karamchand Gandhi) सर्वत्र साजरी झाली. या दिवसाचे औचित्य साधून देशात ठीकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरात मधील साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधींची जयंती साजरी केली. यावेळी पीएम मोदींनी महात्माजींच्या 150 व्या जयंती निमित्त 150 रुपयांचे नाणे जारी केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती (Sabarmati) आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
एएनआय ट्विट -
Ahmedabad: Prime Minister Narendra Modi releases commemorative Rs 150 coins, on the occasion of Mahatma Gandhi's 150th birth anniversary. #GandhiAt150 pic.twitter.com/JAvNpeUcjX
— ANI (@ANI) October 2, 2019
या दरम्यान मोदींनी पुष्पहार अर्पण करून संग्रहालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गांधीजी आश्रमातील गांधीजींच्या निवासस्थान कुंज येथेही ते गेले होते. मोदींनी अभ्यागत पुस्तकात आपले विचार लिहिले, साधारण 20 मिनिटे ते आश्रमात होते. त्यांच्यासमवेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यानंतर गांधींनी 1917 मध्ये हा आश्रम स्थापन केला होता.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा स्मारक टपाल तिकिटे आणि दीडशे रुपयांच्या चांदीचे स्मारक नाणे प्रसिद्ध केले. तसेच वीस हजाराहून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत साबरमती नदीकाठी आयोजित कार्यक्रमात, राष्ट्राला उघड्यावर शौचमुक्त घोषित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी गांधीजींचे ‘My Life is My Message’ या पुस्तकाचे प्रकाशनही केले.
दरम्यान, 2007 पासून गांधी जयंतीचा हा दिवस महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने फ्रान्स आणि श्रीलंकेसह अनेक देशांत गांधींच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात नेते आणि नागरिकांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.