ओडिशाच्या (Odisha) जाजपूर (Jajpur) जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केली आणि नंतर सावत्र आईवर बलात्कार (Rape) केला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. टोमका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलाची सावत्र आई त्याला वडिलांसोबत राहू देत नव्हती, म्हणून तो दुसऱ्या गावात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हा मुलगा आपल्या वडिलांच्या घरी गेला होता. त्यावेळी तिथे त्याने आपल्या सावत्र आईसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने तिच्याशी भांडण करून काही चुकीच्या गोष्टीही बोलल्या. (हेही वाचा: डॉक्टर दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीवर हुक्काबारमध्ये बलात्कार)
मुलाचे असे वर्तन पाहून वडिलांनी यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांनी पत्नीची बाजू घेत मुलाला समजवण्यास सुरुवात केली. यानंतर परिस्थिती चिघळली आणि मुलाने 65 वर्षीय वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यानंतर त्याने सावत्र आईवर बलात्कार केला आणि घरातून पळ काढला. टोमका पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक एसके पात्रा यांनी सांगितले की, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाला सोमवारी ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
खून आणि बलात्काराचे कारण शोधण्यासाठी आरोपीची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी उत्तर प्रदेशातील बांदा येथेही सावत्र आईवर बलात्काराची घटना समोर आली होती. येथे मुलाने आपल्याच सावत्र आईवर बलात्कार केला होता, एवढेच नाही तर आईने विरोध केल्यावर त्याने तिलाही मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.