एक्स्प्रेस वे (Expressway) वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती 140 किलोमीटर प्रतितास करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक सादर केले जाणार आहे. विविध श्रेणींमधील मार्गांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करणे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह 2021 (India Today Conclave 2021) मध्ये बोलत होते.
"भारतात वाहनांच्या वेग मर्यादेचा मापदंड निश्चित करणं हे एक मोठं आव्हान आहे. मात्र चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेग मर्यादा कमीत कमी 100 किलोमीटर प्रतितास तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेग मर्यादा 80 किलोमीटर प्रतितास आणि 75 किलोमीटर प्रतितास असली पाहिजे," असं गडकरी म्हणाले. ('पुढील 3-4 महिन्यात सार्या वाहन निर्मिती करणार्यांना वाहनामध्ये Flex Engines देणं सक्तीचं करण्याचे आदेश देणार' - मंत्री नितीन गडकरी)
तसंच एक्स्प्रेस वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून 140 किलोमीटर प्रतितास केली पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु, कारच्या वेगाबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही करु शकत नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, वाहनांच्या वेगमर्यादे संदर्भात एक फाईल बनवली असून ती संसदेत सादर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
देशात आता एक्स्प्रेस वे च्या दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणताही कुत्रा, पादचारी या मार्गांवर प्रवेश करु शकत नाही, ही जमेची बाजू देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केली.