New Coronavirus Strain: भारतामध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या रुग्णांनी गाठला 100 चा टप्पा; देशात एकूण 102 प्रकरणे
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात असून, 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जात आहे. दुसरीकडे देशात यूकेमधील नवीन कोरोना स्ट्रेनच्या (New Coronavirus Strain) रुग्णांची संख्याही वाढत आहे. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील 102 लोक ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनमुळे ग्रस्त आहेत. संबंधित राज्य सरकारांनी अशा रुग्णांना नियुक्त केलेल्या आरोग्य केंद्रांवर स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवले आहे. तसेच त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि आता अशा लोकांसोबत प्रवास केलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत मंत्रालयाने सांगितले की, देशातील या नव्या स्ट्रेनच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. लोकांचा शोध, त्यांची तपासणी आणि नमुने INSACOG ला पाठविण्यासाठी राज्यांना सतत सूचना दिल्या जात आहेत. यूकेमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन सापडल्यानंतर, ब्रिटन आणि युरोपच्या बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा धोका आणखीन वाढला आहे. हेच कारण होते की भारतानेही देशात याबाबत कडक उपयोजना राबवल्या. सध्या यूकेमधून आलेल्या लोकांना शोधण्याचे काम चालू आहे. (हेही वाचा: SII कोविशिल्ड लस खाजगी बाजारात 1000 रूपयांना तर GoI ला पहिले 100 Mn डोस प्रति 200 रूपयांना विकणार)

डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन आणि सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनची पुष्टी झाली आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 15,968 रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील एकूण संसर्गांची संख्या 1 कोटी 4 लाख 95 हजार 147 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, करोनाच्या विषाणूमुळे गेल्या 24 तासांमध्ये 202 रुग्णांचा मृत्यू झाला. या बरोबरच देशातील एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1 लाख 51 हजार 529 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,1,29,111 रुग्ण बरे झाले आहेत.