Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

गुजरातमध्ये (Gujarat) नवरात्रीच्या (Navratri 2023) 6 दिवसांत, हृदयाशी संबंधित प्रकरणांसाठी 108 आपत्कालीन रुग्णवाहिकांना 521 कॉल आणि श्वासोच्छवासाच्या समस्येसाठी 609 कॉल करण्यात आले. राज्यात नवरात्रीनिमित्त गरबा खेळत असताना आणखी एका 17 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत गरब्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार नुकतेच, गरबा खेळत असताना 17 वर्षीय युवक वीर शाहला हृदयविकाराचा झटका आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला.

त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शारीरिकदृष्ट्या निरोगी 17 वर्षांच्या वीरने नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गरब्यात भाग घेतला होता. त्याच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांनी गरबा नृत्याचा कार्यक्रम बंद केला.

गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नवरात्रीच्या काळात गरबा उत्सवादरम्यान गरबा आयोजकांकडून डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही सर्व सरकारी रुग्णालयांना अलर्ट जारी केला आहे. गरबा मैदानाजवळील सीएचसी केंद्रांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. गरबा आयोजकांना कॉरिडॉर बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून रुग्णवाहिका त्वरीत मैदानामध्ये येऊ शकतील. (हेही वाचा: Delhi Crime: दिल्लीत MCD शाळेच्या भिंतीजवळ आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून गुन्हा दाखल)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे कमी सेवन, मीठाचा असंतुलित वापर, रक्तदाब, झोप न लागणे आणि अनुवांशिक समस्यांमुळे हृदयविकाराची समस्या उद्भवते. गरबा खेळताना हृदयविकाराचा त्रास होऊ नये यासाठी गरबा मोकळ्या जागेत खेळावा, आयोजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण द्यावे, असे डॉ.प्रवीण गर्ग यांनी सांगितले. गरब्याच्या ठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी आणि हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त वेळ खेळू नये, असेही ते म्हणाले.