प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

नागालँडमध्ये (Nagaland) सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत 'चुकीच्या ओळखी'मुळे 13 स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सुरक्षा दलाच्या एका जवानाचाही मृत्यू झाला. ही घटना  म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या नागालँडमधील मोन (Mon) जिल्ह्यातील ओटिंग गावातील आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे आणि या घटनेची विशेष तपास पथक (SIT) चौकशी करेल असे सांगितले.

या घटनेचा निषेध करताना नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ म्हणाले, ‘मोनच्या ओटिंगमध्ये नागरिकांच्या हत्येची घटना अतिशय दुःखद आहे. मी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा व प्रार्थना आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करेल आणि कायद्यानुसार न्याय मिळेल. मी सर्व स्तरातून शांततेचे आवाहन करतो.’

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांचा नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही कारण 11 जण जागीच मरण पावले आणि अनेकांचा शेजारच्या आसाममधील रुग्णालयात मृत्यू झाला. ही संख्या वाढूही शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मृत्यू पावलेले लोक मिनी पिकअप ट्रकमधून परतत होते. हे लोक घरी न परतल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचे मृतदेह सापडले. यानंतर गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या.

या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कोन्याक समाजातील लोकांनी कोहिमा येथे सुरू असलेल्या हॉर्नबिल महोत्सवापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर आसाम रायफल्सची प्रतिक्रियाही आली आहे. एका अधिकृत निवेदनात आसाम रायफल्सकडून सांगण्यात आले की, परिसरात बंडखोरांच्या हालचालींची पुष्टी झाली होती, ज्याच्या आधारे या कारवाईची तयारी करण्यात आली. (हेही वाचा: जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक)

या संपूर्ण घटनेवर आसाम रायफल्सने खेद व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्च पातळीवर चौकशी करण्यात येत असून दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्रालयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले- ‘जेव्हा सामान्य जनता आणि सुरक्षा कर्मचारी स्वतःच्या भूमीवर सुरक्षित नसतात, तेव्हा सरकारने योग्य उत्तर द्यावे की गृह मंत्रालय काय करत आहे?’