Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सर्व होर्डिंग स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी तपासण्याचे आदेश; बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
(Photo Credits: @mybmc)

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेचे (Ghatkopar Hoarding Collapse)बचाव कार्य पूर्ण झाले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी सर्व होर्डिंग तपासण्याचे आदेश दिले असल्याचे बीएमसी आयुक्तांनी सांगितले आहे. "ही एक दुःखद घटना होती. ज्यात 16 लोकांचा मृत्यू झाला. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. हा एक सक्रिय पेट्रोल पंप असल्यामुळे आमच्या येथे बचाव कार्याला अनेक अडथळे आले. त्यामुळे बचावकार्याला उशीर झाला," असे भूषण गगराणी म्हणाले.

बीएमसी आयुक्त गगराणी यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व होर्डिंग तपासण्याचे आदेश दिले आहेत. "सर्व होर्डिंग्सना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यांना आवश्यक स्थैर्य प्रदान करण्यासाठी त्यांचा आकार, पाया या सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, मुंबईत आणखी तीन होर्डिंग्ज काढले जात आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई पोलिसांनी पंतनगर पोलिस ठाण्यात भावेश भिंडे आणि इतरांविरुद्ध आयपीसी 304, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकूण ४४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३१ जणांना मंगळवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की एनडीआरएफ, अग्निशमन दल मुंबई पोलीस यांनी बचाव कार्यात लक्षणीय मदत केली.