Vande Bharat Train | (File Image)

वंदे भारत एक्स्प्रेसने (Vande Bharat Express) प्रवास करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 27 जून रोजी पंतप्रधान मोदी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचाही (Mumbai-Goa Vande Bharat Express) समावेश आहे. मेक इन इंडिया धोरणानुसार आयसीएफ (ICF) द्वारे निर्मित या हाफ--हाय-स्पीड ट्रेन्स देशभरातील विविध शहरांना जोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी 27 जून रोजी एकाच वेळी देशातील पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे अनावरण करणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या मार्गांवर धावतील. या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल. या गाड्यांच्या समावेशामुळे विविध शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीसुविधा मिळतील, तसेच आरामदायी आणि एका आधुनिक वाहनाने प्रवास करण्याचा अनुभव मिळेल.

वंदे भारत एक्सप्रेस गाड्या अत्याधुनिक सुविधांसाठी ओळखल्या जातात. यामध्ये आरामदायक आसनव्यवस्था, प्रगत सुरक्षा फीचर्स आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा समावेश आहे. या गाड्या अर्ध-उच्च गतीने चालवण्यासाठी, जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आणि शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. या पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा भारतीय रेल्वेचा पुढाकार रेल्वेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांसाठी प्रवासाचे पर्याय वाढवण्याची सरकारची वचनबद्धता दर्शवितो. (हेही वाचा: Tamil Nadu Accident: तामिळनाडू मेलपट्टमपक्कममध्ये दोन खासगी बसची धडक, 70 लोक जखमी)

या नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या अतिरिक्त मार्गांवर सुरू केल्याने पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' उपक्रमालादेखील लक्षणीय चालना मिळेल. या गाड्या देशांतर्गत तयार केल्या जातात, ज्यामुळे देशाच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीस हातभार लागतो. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या महिन्याच्या सुरुवातीला गोवा-मुंबई वंदे भारतचे उद्घाटन करणार होते, परंतु ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला.