![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Add-a-heading-2023-07-27T171418.191-380x214.jpg)
जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. तब्बल 33 वर्षांनंतर श्रीनगरच्या (Srinagar) रस्त्यावर मोहरमचा ताजिया (Muharram Procession) निघाला आहे. हे शिया मुस्लिम बहुल क्षेत्र असूनही 1989 पासून या ठिकाणी मोहरमच्या मिरवणुका निघाल्या नव्हत्या. श्रीनगरमधील शिया समुदायाने पारंपारिक गुरुबाजार-दलगेट मार्गाने मोहरमची मिरवणूक काढली. श्रीनगरच्या प्रसिद्ध लाल चौक परिसरातून ही मिरवणूक निघाली. याआधी 1990 च्या दशकात झालेल्या हिंसाचारामुळे या मार्गावरून मोहरम मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. यावर्षी जम्मू-काश्मीर प्रशासनाने ही बंदी हटवण्याची परवानगी दिली.
मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना मानला जातो. मुस्लिम समाजासाठी याला धार्मिक महत्त्व आहे. मोहरमच्या आठव्या दिवशी ही मिरवणूक काढली जाते.
मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाने सकाळी 6 ते 8 अशी वेळ दिली होती. पहाटे 5.30 वाजता शिया समाजातील शेकडो लोक गुरुबाजार येथे जमले. त्यानंतर सहा वाजल्यापासून मिरवणूक काढण्यात आली. काश्मीरचे विभागीय आयुक्त व्हीके विधुरी म्हणाले, ‘काश्मीरच्या लोकांनी निर्माण केलेल्या चांगल्या वातावरणामुळे ही परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सकाळी मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली. हा कार्यक्रम शांततेत पार पडला.’
#WATCH | Srinagar, J&K | Muharram procession taken out through its historic route in the city. The procession was allowed from 6 am to 8 am today, by the Administration. pic.twitter.com/fqbq6uOGwP
— ANI (@ANI) July 27, 2023
काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून शिया समुदायाकडून या मार्गावर मिरवणूक काढण्याची मागणी करण्यात येत होती. यावेळी प्रशासनाने परवानगी दिल्याने आम्ही सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली. यासाठी एक दिवस आधी उच्चस्तरीय बैठकही झाली. मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते, विशेषत: नवीन पिढीतील मुलांचा यात समावेश होता. या मुलांनी आजवर ही शोक मिरवणूक पाहिली नव्हती. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असून ठिकठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. सरकारचा हा मोठा निर्णय पाहून शिया समुदायाचे लोक खूप खूश झाले आणि त्यांनी एलजी प्रशासनाचे आभार मानले. (हेही वाचा: Reservation for Transgender Persons in Nursing Courses: केरळ सरकारचा मोठा निर्णय! ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्समध्ये आरक्षण जाहीर)
दरम्यान, अहवालानुसार, 1989 मध्ये अशाच एका मोठ्या मिरवणुकीत काही दहशतवादी घुसले होते. त्यावेळच्या प्रसिद्ध HAJY ग्रुपचे दहशतवादी कमांडर म्हणजेच हमीद शेख, अशफाक मजीद, जावेद मीर आणि यासिन मलिक यांचा समावेश होता. मिरवणुकीत देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली, ती पाहून तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी त्यावर बंदी घातली होती. आता तब्बल 33 वर्षानंतर ही बंदी उठवली गेली.