MP Minister Imarti Devi on Coronavirus: ‘माझा जन्म शेणा-मातीत झाला, त्यामुळे कोरोना माझ्या जवळही नाही येणार’; मध्य प्रदेशातील मंत्री इमरती देवी यांचा अजब दावा (Video)
Madhya Pradesh Minister Imarti Devi (Photo Credit : ANI)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात सरकारमधील मंत्री इमरती देवी (Imarti Devi) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की कोरोना विषाणूबाबत (Coronavirus) त्यांनी एक अजब दावा केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ‘माझा जन्म शेणा-मातीत झाला त्यामुळे कोरोना माझ्या जवळही येणार नाही.’ एका मंत्र्याने केलेले हे वक्यव्य सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबतच व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 3 सप्टेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा ग्वाल्हेरमध्ये मुक्काम असताना मंत्री राज्यसभेचे सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

या व्हिडिओमध्ये इमरती देवी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या अफवा पसरल्यामुळे संतप्त झालेल्या दिसत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणतात, ‘मी मातीत जन्माला आले आहे, शेणात जन्माला आले आहे, कोरोना माझ्या जवळही येऊ शकणार नाही. हा मास्क देखील जबरदस्तीने घातला आहे.’ या आधीही अनेक नेते कोरोना विषाणू बाबत अशी अजब वक्यव्ये करून चर्चेचा विषय ठरले आहेत. (हेही वाचा: एका दिवसात देशात कोरोना व्हायरसचे 75,809 रुग्ण वाढले, एकुण बाधितांंची संख्या 42,80,423 वर)

पहा व्हिडीओ -

या घटनेच्या तीन दिवस अगोदर मंत्री इमरती देवी यांनी विकासकामांबाबत अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी अशी बातमी आली होती की त्या आजारी आहेत व बैठकीतून उठून गेल्या. त्यानंतर अशी अफवा पसरली की, इमरती देवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या. आपल्याला कोरोना झाला या अफवांमुळे त्या मीडियावर चिडल्या होत्या.

मात्र आता त्यांच्या हा अजब दाव्याचा व्हिडीओ कॉंग्रेसचे नेतेही सोशल मीडियावर शेअर करत आहेत.