ओडिशाचा मांझी आणि कॅनल मॅन अशी ओळख प्राप्त झालेला, पद्मश्री पुरस्कार (Padma Shri) विजेता दैतारी नायक (Daitari Naik) याने आता आपला पद्मश्री पुरस्कार परत देण्याची इच्छा व्यक्त आहे. दैतारी नायक यांचे म्हणणे आहे की, आधी ते एक मजदूर म्हणून काम करत होते पण पद्मश्री मिळाल्यानंतर लोक त्यांचा आदर करतात आणि काही काम देत नाहीत. याच गोष्टीमुळे दैतारी नायक यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय खालावली आहे. सध्या त्यांच्यावर गरीबीचे असे सावट पसरले आहे की, ते चक्क मुंग्यांची अंडी खावून जीवन जगत आहेत. दैतारी नायक यांचे म्हणणे आहे की, पद्मश्री मिळाल्यामुळे त्यांचा कोणताही फायदा झाला नाही, उलट झाले ते आर्थिक नुकसानच. आता त्यांना त्यांचा हा पद्मश्री पुरस्कार परत करायचा आहे.
दैतारी नायक यांनी आपल्या गावात डोंगर पोखरून 3 किमी लांबीचा कॅनल बनवल्याने, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या 70 व्या वर्षी ही अचाट कामगिरी केल्याने त्यांची संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण झाली होती. ओडिशा टीव्हीच्या अहवालानुसार, गेल्या एक वर्षापासून दैतारी नायक पक्का कॅनल मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे, परंतु प्रशासनाकडून अजूनपर्यंत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. याबाबत दैतारी म्हणतात, 'आमच्या गावात मूलभूत सुविधा देखील नाही, पक्का रोड नाही, आंगनवाडी केंद्र नाही, रुग्णालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत या पद्मश्रीचा मला काहीही उपयोग नाही. त्यामुळे तो मी परत करू इच्छितो.’
अशात पद्मश्री मिळाल्याने दैतारी यांना काम मिळणे बंद झाले आहे. यामुळे परिवाराची स्थिती इतकी खराब झाली आहे की, घरात खायला अन्नदेखील नाही. हे कुटुंब मुंग्यांची अंडी खावून आपली गुजराण करत आहे. सरकारकडून यांना 700 रुपयांची पेन्शन मिळते, मात्र त्यात कुटुंबाचे भागत नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत घर मंजूर झाले आहे, मात्र तेही अजून पूर्ण झाले नाही.