प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात 1 सप्टेंबरपासून नवीन वाहन कायदा (Motor Vehicles Act) लागू झाला आहे. या कायद्यांतर्गत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर चांगलीच जरब बसवली जात आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास होणाऱ्या दंडामध्ये कैक पतीने वाढ केल्यामुळे, आता नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. ओडिशाच्या (Odisha) संबलपूर (Sambalpur) जिल्ह्यातील एका ट्रक चालकाचे नवीन मोटर वाहन कायद्यांतर्गत आतापर्यंतचे सर्वात मोठे चालान कट करण्यात आले आहे. या ड्रायव्हरला तब्बल 86,500 रुपये दंड भरण्यास सांगितला आहे.

गेल्या आठवड्यात या ड्रायव्हरने अनेक रहदारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक जाधव असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचे चालान 3 सप्टेंबर रोजी कापण्यात आले होते, मात्र शनिवारी संध्याकाळपासून या घटनेचा फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. जाधव यांना विना परवाना गाडी चालवणे (5,000 रुपये), इतर व्यक्तीस गाडी चालवण्यास देणे (5,000 रुपये), 18 टन जादा ओव्हरलोडिंग (56,000 रुपये), अयोग्यरित्या गाडीत सामान ठेवणे (20,000 रुपये) आणि सर्वसाधारण गुन्हा (500 रुपये) यांसाठी दंड आकारण्यात आला आहे. संबलपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी ललित मोहन बेहेरा यांनी याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: नशेच्या अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी आकारला भला मोठा दंड; तरुणाने चिडून बाईकच पेटवली (Watch Video)

एकूण दंडाची रक्कम 86,500 रुपये आहे, परंतु ड्रायव्हरने तब्बल 5 तास अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत सध्या 70,000 रुपये दंड भरला आहे. हा ट्रक नागालँडस्थित बीएलए इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा असल्याचे समजते. या ट्रकमध्ये जेसीबी मशीन देखील होती. हा ट्रक अंगुल जिल्ह्यातून छत्तीसगडमधील तालचेर टाऊनकडे जात होता. 1 सप्टेंबरपासून सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या राज्यांमध्ये ओडिशाचाही समावेश आहे.