उन्हाने त्रासलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला आणि दुष्काळाने गांजलेल्या बळीराजासह नागरिकांना मान्सूनची प्रतिक्षा होती. आता मात्र ही प्रतिक्षा संपली असून मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तरी देखील मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही वर्णी लावेल, असा अंदाज आहे. यामुळे बळीराज्यासह सामान्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज अगदी अचूक ठरला आहे. इतकंच नाही तर पुढील 24 तासांत मान्सून ईशान्य भारतातही सक्रीय होणार आहे.
यंदा भारतात मान्सून उशिराने दाखल झाला. 18 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार येथे धडकला होता. त्यानंतर लवकरच तो केरळात दाखल होईल, अशी आशा होती. मात्र वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सून केरळात 6 जून रोजी दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यातही विलंब झाला आणि 8 जून रोजी मान्सूनचे भारतात आगमन झाले.