Monsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार
Monsoon 2020 (Photo Credits: PTI)

देशभरात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याची दिलासादायक माहिती हवामान विभागाने (India Meteorological Dept) दिली आहे. मान्सून यंदा केरळमध्ये (Kerala) 1 जून रोजी दाखल होणार असून ही खूप चांगली चिन्हे आहेत. तसंच जूनचा पहिला आठवडा हा पश्चिम किनारपट्टीसाठी विशेषतः महाराष्ट्रासाठी चांगला असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचे उपमहासंचालक आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी वर्तवला आहे. वातावरणातील उष्णता आधीच कमी झाली असून भारताच्या वायव्येकडील प्रदेशातही चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरच केरळ किनारपट्टीवर दाखल होणारा पाऊस नागरिकांना सुखावणार आहे.

महाराष्ट्रासाठी ही अतिशय चांगली चिन्हे असून येत्या 3-4 दिवसांत तापमान कमी हळूहळू कमी होऊ लागेल. तसंच 8 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर लवकरच मान्सून पूर्व पावसालाही सुरुवात होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर 8-14 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (येत्या 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; मान्सूनपूर्व पावसाला लवकरच सुरुवात- हवामान विभागाची माहिती)

ANI Tweet:

महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत मान्सून आगमन झाल्यानंतर मुंबईत 11 जून पर्यंत मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा हा अंदाज शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनासाठी आशादायी आहे. दरम्यान यंदा मान्सूनच्या आनंदावर कोविड-19 संकटाचे सावट आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.