![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/Security-forces-in-Jammu-and-Kash-380x214.jpg)
प्रजासत्ताक दिन (Republic Day) शांततेत पार पडावा यासाठी खबरदारी म्हणून, रविवारी काश्मीर खोऱ्यात (Jammu & Kashmir) फोन सेवा (Mobile Phone) बंद करण्यात आल्या आहेत. शनिवारी काश्मीरमध्ये इंटरनेट (Internet) सेवा पुनर्संचयित झाली, मात्र काही तासांमध्येच ही मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पहाटे मोबाइल फोन संपर्क सेवा निलंबित करण्यात आली.
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त 2005 पासून मोबाइल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करणे, हा काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा एक भाग आहे.
2005 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या काळात दहशतवाद्यांनी मोबाइल फोनचा वापर करून, आयईडी स्फोट केला. दरम्यान, यंदा शांततापूर्ण पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खोऱ्यातील मुख्य अधिकृत ठिकाणी जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर, सुरक्षा दल तैनात केले आहेत. इथली इंटरनेट सेवा 25 जानेवारी सायंकाळी 6 ते 26 जानेवारी सायंकाळी 6 या वेळेत बंद करण्यात आली आहे, तर व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा 26 सकाळी ते सायंकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात आली आहेत. (हेही वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर आसाम येथे बॉम्बस्फोट, तपास सुरु)
खोऱ्यातील उंच इमारती मध्येही सुरक्षा व्यवस्था तैनात आहेत. मात्र या काळात जनतेने घराबाहेर पडणे टाळले आहे. हुर्रियत कॉन्फरन्ससारखे अलगाववादी गट 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी बंदची हाक देतात. मात्र यावर्षी असा कोणताही आग्रह झाला नाही. याआधी जम्मू काश्मीरला देण्यात आलेले विशेष अधिकार काढून, कलम 370 रद्द झाले त्यामुळे यंदा खोऱ्यात काही प्रमाणत शांतता आहे.