MNS Gudi Padwa Melava: शिवाजी पार्क येथे मनसे गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
MNS Chief Raj Thackeray | | (Photo Credits: Facebook)

गुढी पाढवा (Gudi Padwa) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर दोन वर्षांनंतर प्रथमच गुढी पाडवा इतक्या मुक्तपणे साजरा होत आहे. त्यामुळे पारंपरीक, सांस्कृतीक कार्यक्रमासोबत राजकीय कार्यक्रमांनाही मोठे भरते आले आहे. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचा मेळावा (MNS Gudi Padwa Melava) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे आज (2 एप्रिल) पार पडत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, मुंबई येथील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) समोर पोस्टरबाजी करत मनसेने शिवसेनेला डिवचले आहे.

शिवसेना भवनसमोर मनसेने झळकवलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे' असा संदेशही या बॅनरवर दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी ते भाजपवर टीका करणार का? मनसे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याबाबतही मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, राज ठाकरे आजच्या मेळाव्यातच भविष्यात अयोध्येला जाण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पाठीमागील काही दिवसांपूर्वी कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांना अयोध्येचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करत त्याच वेळी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार होते. मात्र, दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोना महामारीमुळे हा दौरा पुढे ठकलल्याची चर्चा त्या वेळी होती.

अलिकडेच पुणे येथे मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करणे टाळले होते. त्या ऐवजी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आपल्या रडारवर घेतले होते. त्यामुळे आजच्या भाषणात ते कोणाकोणावर बोलता याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत असल्याचेही बोलले जाता आहे.