देशात कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अशा लोकांना एकांतात ठेवण्यात आले आहे. रोज अनेक लोकांची कोरोना विषाणूची चाचणी होत आहे. मात्र आता पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लुधियाना (Ludhiana) येथे परदेशातून परतलेले तब्बल 167 संशयित रुग्ण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथकही गठित करण्यात आली आहेत. ही दोन्ही पथके या 167 लोकांचा शोध घेत आहेत, मात्र अजून त्यांचा काही पत्ता लागला नाही. अशा परिस्थितीत, जर त्यांच्यात काही कोरोना विषाणूचे रुग्ण असल्यास, इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.
पंजाबमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना परदेश दौर्यावरुन परत आलेल्या नागरिकांची यादी देण्यात आली. आरोग्य विभाग अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरुन त्यांच्यापैकी कोणाला कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना एकाकी ठेवता येईल. मात्र यातील अनेक बेपत्ता असल्याचे दिसत आहे. शहरातील सिव्हिल सर्जन डॉ. राजेशकुमार बग्गा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'परदेशातून येणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी दोन गट तयार केले आहेत. 119 जणांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे व त्यांना आतापर्यंत 12 लोक सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या दुसऱ्या टीमला सुमारे 77 जणांचा शोध घेण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरससाठी आरोग्य मंत्रालयाकडून Anti-HIV औषधांची शिफारस; जयपूरच्या इटालियन जोडप्याला देण्यात आला डोस)
आरोग्य विभागाच्या पथकाला 17 संशयित सापडले आहेत, उर्वरित 167 लोक अद्याप लुधियानामध्ये बेपत्ता आहेत. आतापर्यंत या संशयितांविषयी माहिती न मिळण्याचे एक कारण म्हणजे, पासपोर्टमधील चुकीचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक असू शकतो. याबाबत आरोग्य विभागाने आश्वासन दिले आहे की, ते लवकरच बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतील. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लुधियाना रेल्वे स्थानकात स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.