
एकीकडे राहण्यायोग्य शहरांमधील भारतीय शहरांचे स्थान घसरत आहे, तर दुसरीकडे देशात कोणत्या गोष्टीत घोटाळा होईल याचा काही नेम नाही. फरीदाबादमध्ये (Faridabad) काही महिला एकाच वर्षात चार वेळा, तर काही आठ-दहा वेळा गर्भवती राहिल्या असल्याची घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे या गोष्टीचा तपास आता सीबीआय (CBI) करत आहे. विश्वास बसत नाही ना? पण असे घडले आहे ते कागदोपत्री. महिलांना गर्भवती दाखवून फार मोठा घोटाळा झाला असल्याचे समोर आले आहे. न्यूज 18ने याबाबत वृत्त दिले आहे
खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांनी वर्षामध्ये आठ-दहा वेळा मॅटर्निटीचा फायदा घेतला आहे. तर अनेक महिलांना त्यांच्या कंपनीकडून वर्षातून कैकवेळा गरोदर दाखवण्यात आले आहे. तर काही महिला या फक्त कागदोपत्रीच कंपनीत कामाला आहे. अशा प्रकारे यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत सीबीआयच्या चंदीगड येथील पथकाने सेक्टर-23 शाखा आणि ईएसआयच्या सेक्टर-16 मधील क्षेत्रीय कार्यालयाच्या कागदपत्रांची छाननी केली. यामध्ये अनेक महिलांना प्रसुतीदरम्यान इजा आणि वेतनाचा लाभ दाखवण्यात आला आहे. (हेही वाचा: धक्कादायक : हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने महिलेची उभ्यानेच प्रसूती; बाळाचा फरशीवर पडून मृत्यू)
धक्कादायक म्हणजे या यादीमधील अनेक महिला या त्या कंपनीत कामाला नसल्याचे उघडकीस आले आहे. ज्या महिला खासगी कंपन्यांमध्ये काम करतात व त्यांचे वेतन 21 हजारांपेक्षा कमी आहे. त्यांचे योगदान ईएसआय कॉर्पोरेशनमध्ये वजा केले जाते. प्रसुतीसाठी या महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा व संपूर्ण वेतन दिले जाते. गर्भपात झाल्यास 42 दिवसांची रजा दिली जाते. हे पैसे त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा केले जातात. मात्र या नियमाच्या गैरवापर करत महिलांची खोटी प्रसूती दाखवून ईएसआय कॉर्पोरेशनकडून पैसे घेतले. या सर्व गोष्टींची बिलेही कोणत्याही समस्येशिवाय पास झाली. आता सीबीआय या गोष्टीची चौकशी करत आहे.