प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

औरंगाबाद (Aurangabad) येथील एका रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा फटका एका महिलेला चांगलाच बसला आहे. हॉस्पिटलमध्ये चक्क स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने महिलेची उभ्यानेच प्रसूती झाली. मात्र हे बाळ थेट जमिनीवर पडल्याने बाळाचा मृत्यू झाला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना असून, याबाबत संपूर्ण शहरात संपात व्यक्त केला जात आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही घटना घडली आहे. सोनाली खटमोडे असे या गर्भवतीचे नाव आहे.

सोनाली खटमोडे या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. काल रात्री 1 वाजता त्यांना प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यानंतर डिलिव्हरीसाठी लगेच त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयातील प्रसूती गृह तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यावेळी या महिलेला घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चक्क स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. हे पाहून चालतच ही महिला लिफ्टकडे निघाली. सोनाली चालत कशाबशा लिफ्टपर्यंत पोहोचल्या. पंरतु लिफ्टच्या दरवाज्यातच त्यांची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर त्यांचे बाळ जमिनीवर पडले आणि त्यानंतर बाळाचा जागीच मृत्यू झाला. (गुजरात: मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरांनी केली प्रसुती, आई-बाळाचा मृत्यू)

एका हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने घडलेली ही दुर्दैवी घटना पाहून, महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या गोष्टीसाठी प्रशासनाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.