Mandhardevi Kalubai Yatra 2026: महाराष्ट्र आणि कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील श्री काळुबाई देवीच्या वार्षिक यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. २०२६ मध्ये ही यात्रा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला संपन्न होणार आहे. या यात्रेचा मुख्य दिवस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी आहे.
मांढरदेवीची यात्रेचे प्रमुख वेळापत्रक
मांढरदेवीची यात्रा दरवर्षी पौष महिन्यात पौर्णिमेला भरते. २०२६ च्या नियोजनानुसार, यात्रेचे धार्मिक विधी डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू होतील. मुख्य यात्रेचा काळ १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या दरम्यान असेल. यामध्ये ३ जानेवारी रोजी पहाटे देवीची महापूजा आणि अभिषेक पार पडेल, जो यात्रेचा सर्वात महत्त्वाचा क्षण मानला जातो.
२ जानेवारी २०२६ च्या रात्री देवीचा छबिना आणि जागर आयोजित केला जाणार आहे. या काळात गडावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
प्रशासकीय नियम आणि सुरक्षा
सातारा जिल्हा प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून यात्रेसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांतील दुर्घटना टाळण्यासाठी गडावर कडक निर्बंध पाळले जातात. यावर्षीही मंदिर परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, पशूहत्येसारख्या प्रथांनाही परवानगी दिली जाणार नाही.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाई आणि सातारा परिसरातून गडावर जाणाऱ्या रस्त्यांचे नियोजन केले जात असून, राज्य परिवहन मंडळाकडून (MSRTC) विशेष जादा बसची सोय करण्यात येणार आहे.
भाविकांची सुरक्षा आणि सुविधा
गडावर पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहताना त्रास होऊ नये, यासाठी विशेष बॅरिकेड्स आणि सावलीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.