Ill Money Transactions: व्यक्तीने 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करून केली फसवणूक; ED ने सुरु केली अवैध पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू
Enforcement Directorate | (Photo Credit: Twitter/ANI)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज बनावट डॉक्टर रमेश स्वेनच्या (Ramesh Swain) अवैध पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय चौकशीसाठी स्वेनला रिमांडवर घेऊ शकते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालय पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवालही मागवला आहे. देशभरातील अनेक महिलांशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी 54 वर्षीय बनावट डॉक्टरला अटक करण्यात आली होती. त्याला 2021 मध्ये शहर पोलिसांनी अटक केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, रमेशने 10 राज्यांतील 27 महिलांशी लग्न करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. रमेश स्वेन याला बिभू प्रकाश स्वेन या नावानेही ओळखले जाते. महिलांच्या फसवणुकीसह रमेशवर, 2011 मध्ये हैदराबादमधील लोकांना त्यांच्या मुलांना एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा देण्याचे आश्वासन देऊन 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा, 2006 मध्ये केरळमधील 13 बँकांना 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि बनावट क्रेडिट कार्ड बनवल्याचाची आरोप आहे.

या प्रकरणात पोलिसांनी स्वेनची पत्नी डॉ. कमला सेठी, तिची सावत्र बहीण आणि ड्रायव्हरलाही अटक केली होती. त्यानंतर या सर्वांना ओडिशा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताकडून जप्त केलेल्या कागदपत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी एजन्सी राज्य पोलिसांच्या संपर्कात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की स्वेनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाईल आणि एजन्सी काही क्षणी चौकशीसाठी त्याची कोठडी मागू शकते. (हेही वाचा: Chennai: इलेक्ट्रिक मोटरमध्ये लपवून ठेवलेले 95.15 लाख रुपये किमतीचे सोने, चेन्नई विमानतळ कस्टम्सने केली कारवाई)

आठ महिन्यांपासून त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या ओडिशा पोलिसांच्या विशेष पथकाने 13 फेब्रुवारीला स्वेनला अटक केली होती. स्वेनने भुवनेश्वरमध्ये किमान तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते जिथे तो वेगवेगळ्या वेळी त्याच्या तीन पत्नींसोबत राहत होता. त्याच्या पत्नींनी पोलिसांना सांगितले की, तो अनेकदा त्यांच्या पत्नींना उधार पैसे मागायचा आणि पैसे मिळताच पुढच्या पत्नीचा शोध सुरू करायचा. पीडितांमध्ये वकील, शिक्षक, डॉक्टर आणि उच्चशिक्षित महिलांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक ओडिशाबाहेरील आहेत.