महाराष्ट्रामध्ये 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाने या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे आणि सातारा येथील जिल्हाधिकारी देखील बदलण्यात आले आहेत. पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेले पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase) यांना पदोन्नती देण्यात आली आहे तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना आता पुणे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सुहास दिवसे यांना प्रमोशन
पूजा खेडकर च्या बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र त्यांनी हे आरोप फेटाळत पूजा खेडकर यांचा बनाव असल्याचे सांगत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता दिवसे यांनी प्रोमोशन देण्यात आले आहे.
अन्य आयएएस ऑफिसर मध्ये मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग झाले आहेत. I.A.कुंदन प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग झाले आहेत. विनिता वैद सिंगल प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग झाल्या आहेत. डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग करण्यात आले आहे. डॉ. निपुण विनायक सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग करण्यात आले आहे.
जयश्री भोज सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग पदी आल्या आहेत. एच.एस.सोनवणे यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.