विरोधी पक्षांचे एकत्रिकरण हे माझ्या नाही देशातील जनतेच्या विरोधात- नरेंद्र मोदी
PM Narendra Modi (Photo Credit: ANI)

पश्चिम बंगाल (West Bengal) मधील कोलकता (Kolkata) येथे तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बनर्जी (Mamata Banerjee) सह इतर विरोधी पक्षांनी महारॅलीचे आयोजन केले होते. याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आवाज उठवला. भ्रष्टाचाराविरोधात पावलं उचलायला लागल्यावर सर्व भ्रष्ट पक्ष एकत्र आले. त्यांचा हा विरोध माझ्या नाही तर जनतेच्या विरोधात असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते सिल्वासा (Silvassa) येथे बोलत होते.

आमचं सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही तर 130 कोटी जनतेसाठी काम करतं, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. लोकशाहीची गळाचेपी करणारे आता लोकशाहीची भाषा करत असल्याचे मोदी म्हणाले.

इतकंच नाही तर आपलं कुटुंब पुढं नेण्याचा आमचा प्रयत्न नसून भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

दादरा नगर हवेली आणि दमण दीव स्वतंत्र झाल्यानंतर हे पहिले मेडिकल कॉलेज आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये 150 जागा आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिल्वासा येथे पॅरामेडिकलचे 250 आणि दमणमध्ये नर्सिंगच्या 50 जागांची व्यवस्था करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. उत्तम प्रतीच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी याची नक्कीच मदत होईल, असेही मोदी म्हणाले.