मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणपती बाप्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरात दोन मुख्य गणेशोत्सव साजरे केले जातात, त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे माघ महिन्यातील 'गणेश जयंती'. 2026 मध्ये माघी गणेश जयंती गुरुवार, 22 जानेवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गणेश जयंती 2026: तिथी आणि शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. २०२६ मधील महत्त्वाच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:
गणेश जयंती तारीख: 22 जानेवारी 2026 (गुरुवार).
चतुर्थी तिथी प्रारंभ: 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:47 वाजता.
चतुर्थी तिथी समाप्ती: 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:28 वाजता.
मध्यान्ह पूजा मुहूर्त: सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 पर्यंत.
हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे.
माघी गणेश जयंतीचे महत्त्व
माघी गणेश जयंतीला 'वरद चतुर्थी' किंवा 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात 'विनायक' नावाने अवतार घेतला होता.
भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने जास्त कार्यरत असते, अशी श्रद्धा आहे.
कशी केली जाते पूजा?
महाराष्ट्रात, विशेषतः कोकण आणि मुंबई-पुण्यात माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. 1. अभ्यंगस्नान: सकाळी लवकर उठून स्नान केले जाते. 2. स्थापना: अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. 3. नैवेद्य: बाप्पाला मोदक प्रिय आहेत, मात्र माघी जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व असते. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. 4. स्तोत्र पठण: 'गणपती अथर्वशीर्ष' किंवा 'संकष्टनाशन स्तोत्र' वाचल्याने सुख-समृद्धी लाभते असे मानले जाते.
चंद्र दर्शनाबाबत खबरदारी
भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 ते रात्री 10:04 या काळात चंद्र पाहणे अशुभ मानले जाते (मिथ्या दोष), ज्यामुळे व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते असे म्हटले जाते.