मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) गुनामध्ये (Guna) एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी महिलेवर काळीज पिळवटून टाकणारा अत्याचार घडला आहे. महिलेच्या खांद्यावर तिचा दीर बसला होता व त्याला घेऊन ही महिला तीन किलोमीटर चालत होती. या घटनेची शोकांतिका म्हणजे या महिलेसोबत गावातील अनेक लोक चालत होते मात्र कोणीही हे कृत्य थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडीओमध्येही तरुण हसताना दिसत आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही लाजिरवाणी घटना गुना जिल्ह्यातील सिरसी पोलिस स्टेशन परिसरातील सागई आणि बांसखेडी या गावची आहे. पीडित महिला विवाहित असून ती दगडाफळा गाव पंचायत राय बमोरी विधानसभा येथील रहिवासी आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पहिले सासर बांसखेड़ी येथे आहे. तिच्या पतीला तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहायचे होते. महिलेने ही गोष्ट मान्य केली व त्याचसोबत स्वतःही सागई गावातील दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली. 1 महिन्यापासून ही महिला सागई गावातील तरुणासोबत पती पत्नीसारखी राहत आहे.
A married tribal woman in Guna was beaten up, shamed and forced to carry her relatives on her shoulders as punishment @ndtv @ndtvindia @NCWIndia @sharmarekha @ChouhanShivraj @drnarottammisra @OfficeOfKNath @manishndtv @GargiRawat @vinodkapri @rohini_sgh pic.twitter.com/H8ZJL8m86g
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 15, 2021
त्यानंतर अचानक 9 तारखेला महिलेचा सासरा, दीर आणि इतर मुले असे जवळपास 8 जण मोटरसायकलवरून आणि चालत सागई गावी आले. तिथे त्यांनी महिलेला मारहाण केली व तिला जबरदस्तीने घेऊन गेले. सागई गाव ते बांसखेडी हा रस्ता 3 किमीचा आहे. या दरम्यान दीर महिलेच्या खांद्यावर बसला होता व तिला मारत ते घरी घेऊन गेले. या प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे दोघेही भिल समाजातील आहेत. (हेही वाचा: मालेगाव येथील मदरशात गुंगीचे औषध देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन महिलांसह आरोपी अटकेत)
या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, लवकरच चौथ्या आरोपीलाही अटक केली जाईल, असे एसपीचे म्हणणे आहे. सिरसी पोलिस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा म्हणाले की, या प्रकरणात 4 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.