मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर (Indore) मध्ये मंगळवारी रात्री साधारण 2 वाजता शिवसेना नेते रमेश साहू (Ramesh Sahu) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते रमेश साहू तेजाजी पोलीस स्टेशन परिसरातील उमरिखेडा येथे ढाबा चालवत होते. रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. हा खून नक्की कोणी व का केला याचा अजून खुलासा झाला नाही. सध्या मारेकरी पळून गेले आहेत आणि शिवसेना नेत्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मयत रमेश साहू हे मध्य प्रदेशमध्ये शिवसेनेचे प्रमुखही (Former Shiv Sena Chief) राहिले आहेत.
ढाब्याबाहेरील कर्मचार्यांनी ढाब्याच्या आत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आली. रमेश साहू विरोधात खुनाचे आरोप, जमीनीबाबत वाद यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत. इंदूरचे पोलिस महानिरीक्षक हरिनारायण चारी मिश्रा यांनी बुधवारी सांगितले की, साहू यांची ढाब्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी सामान विखुरलेले होते व चार ते पाच कामगार ढाब्यावर झोपले होते, पण कुणालाही गोळीचा आवाज ऐकू आला नाही. एक कुत्रा देखील आहे, परंतु तोही भुंकला नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. (हेही वाचा: मुंबई भाजपा नेत्यांनी सरदार तारा सिंह यांच्या निधनाचा शोक संदेश शेअर केल्यानंतर ट्वीटस केले डिलिट)
इंदूरच्या दोन पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वीच साहू यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल असल्याने, अशा परिस्थितीत हा खून जुन्या वादातून झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणी जवळपास बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज पोलिस तपासत आहेत. अतिरिक्त एसपी शशिकांत कनकणे यांनी अद्याप याबाबतीत काही माहिती दिली नाही. यासह ढाब्यावरील लोकांचीही चौकशी केली जात आहे. नातेवाईकांचे म्हणणे आहे की खुनाचे मुख्य कारण म्हणजे लुट हे आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी खून, दरोडा आणि शत्रुत्वाच्या आधारे तपास सुरू केला आहे.