Madhya Pradesh: 16 व्या मुलाला जन्म दिल्यानंतर आई व नवजात अर्भकाचा मृत्यू, CMO नी दिले चौकशीचे आदेश
Representational Image (Photo Credits: Pixabay)

लोकसंख्येच्या बाबतीत सध्या भारताचा जगात दुसरा नंबर आहे. सरकार लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती राबवत आहे, मात्र देशात असे अनेक प्रदेश आहेत, लोक आहेत ज्यांना याचे महत्व नाही. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील दमोह (Damoh) जिल्ह्यातील बटियागढ़ ठाण्याअंतर्गत येणारे गांव पाडाझिर (Padajhir) मधून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. इथे शनिवारी एका 45 वर्षीय महिलेने आपल्या 16 व्या मुलास जन्म दिला, परंतु काही तासांनंतर ही महिला आणि तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला. आशा कार्यकर्ता कल्लोबाई विश्वकर्मा यांनी रविवारी सांगितले की, पाड़ाझिर येथे राहणाऱ्या सुखराणी अहिरवार (Sukhrani Ahirwar) यांनी शनिवारी आपल्या 16 व्या मुलाला जन्म दिला.

प्रसूतीदरम्यान प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी तिला आणि तिच्या नवजात मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित हलवले. परंतु रस्त्यावरच आई व मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय कल्लोबाई विश्वकर्मा म्हणाल्या की, सुखरणी अहिरवार ही महिला सोळाव्यावेळी आई झाली आहे. महिलेच्या पहिल्या 15 मुलांपैकी केवळ 4 मुले आणि 4 मुली जिवंत आहेत, तर 7 मुले आधीच मरण पावली आहेत. (हेही वाचा: नवजात बाळाला 6-6 बोटं म्हणून नर्सने कापले एक-एक बोटं; बाळाचा मृत्यू)

दमोह जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. संगीता त्रिवेदी म्हणाल्या की, सरकारच्या अनेक योजना अजूनही या महिलेचे कौटुंबिक नियोजन नसणे हा तपासणीचा विषय आहे व याची चौकशी केली जाईल। यामध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाईल. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहतीमधील महिलेने, आपल्या 21 व्या बाळाला जन्म दिला होता. लंकाबाई खरात असे या महिलेचे नाव आहे.

लंकाबाई या 40 वर्षांच्या आहेत. त्यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. त्यांची नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आता त्या 21 व्या वेळी बाळंत होत्या मात्र हे अर्भकही दगावले आहे.