मध्य प्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका? ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक 17 काँग्रेस आमदारांचे बंड; BJP अविश्वास प्रस्तावाच्या तयारीत
Chief Minister Kamal Nath | (Photo Credits: Facebook)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ (Chief Minister Kamal Nath) यांच्या रुपात असलेल्या काँग्रेस सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी कथीररित्या बंड केले आहे. तसेच, हे आमदार बंगळुरु येथे पोहोचले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) समर्थक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजप (BJP) कमलनाथ सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 6 मंत्र्यांसह बंडखोर 17 आमदारांपैकी 2 मंत्री आगोदरच बंगळुरु येथे पोहोचले होते. तर उर्वरीत आमदारांना दिल्ली येथून 3 चार्टर्ड विमानांनी बंगळुरु येथे नेण्यात आले. हे सर्व आमदार दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास बंगळुरु विमानतळावर पोहोचले.

बंडखोर मंत्र्यांची नावे

कमलनाथ सरकारमधील बंडखोर मंत्र्यांमध्ये प्रधुम्न सिंह तोमर, तुलसी सिलावट, गोविंद राजपूत, प्रभुराम चौधरी,इमारती देवी, महेंद्र सिसोदिया यांचा समावेश आहे. सर्व मंत्री हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात.

बंडखोर आमदारांची नावे

दरम्यान, कमलनाथ सरकारमधील बंडखोर आमदारांमध्ये राजवर्धन सिंह, ओपीएस भदौरिया, गिरिराज दंडोतिया, बिजेंद्र यादव, जसपाल जज्जी, रणवीर जाटव, कमलेश जाटव, जसवंत जाटव, रक्षा सिरोनिया, मुन्ना लाल गोयल, सुरेश धाकड़, रघुराज कसाना, हरदीप सिंह डंग आदींचा समावेश आहे. या सर्व आमदारांना 3 चार्टर प्लेनच्या माध्यमातून दिल्ली येथून बंगळुरु येथे नेण्यात आले.

अधिक माहिती अशी की, बंडखोर आमदारांमधील हरदीप सिंह डंग यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे या आधीच सोपवला आहे. तर दुसरे एक आमदार बिसाहू लाल सिंह हे काल बंगळुरु येथून भोपाळ येथे परतले आहेत. भाजपतील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, बिसाहू लाल सिंह हेसुद्धा भाजपसोबत आहेत आणि एका मोठ्या अश्वासनानंतर ते भोपाळला परतले आहेत. गरज पडेल तेव्हा ते भाजपसोबत उभे राहतील. (हेही वाचा, Yes Bank Crisis: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पूरती वाट लावली- राहुल गांधी)

भाजप अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, येत्या 16 मार्च पासून सुरु होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात भाजप कमलनाथ सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. जर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपला साथ दिली तर, या आमदारांच्या मदतीने काँग्रेस प्रणित कमलनाथ सरकार पाडण्याचा भाजपचा विचार आहे.

बंडखोर असलेले सर्व आमदार आणि मंत्री हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटाचे असल्याची चर्चा आहे. या चर्चेसोबतच येत्या काही काळात ज्योतिरादित्य सिंधिया हे स्वत:च मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशी चर्चा या पूर्वीही झाली होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे कालांतराने पुढे आले.