Madhya Pradesh ByPoll Results 2020: मध्य प्रदेशमध्ये BJP ने मारली जोरदार मुसंडी; मिळवल्या तब्बल 21 जागा, कमलनाथ यांनी स्वीकारला पराभव
Counting of Votes (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेशातील 28 विधानसभा (Madhya Pradesh assembly By-Elections) जागांसाठी झालेल्या पोट-निवडणुकीसाठी निकाल लागला आहे. यामध्ये 21 जागा जिंकून भाजपाने (BJP) आघाडी कायम ठेवली आहे. कॉंग्रेसने (Congress) 7 जागा जिंकल्या आहेत. मध्य प्रदेशातील 28 विधानसभा जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. 3 नोव्हेंबर रोजी 19 जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या.  गृहमंत्री अमित शहा यांनीही या भाजपच्या विजयाचे अभिनंदन केले आहे. आता राज्यात भाजपचे सरकार राहणार हे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी मंगळवारी राज्यातील 28 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव स्वीकारला आहे.

कमलनाथ यांनी ट्विट केले की, ‘आम्ही जनादेशाचा आदर करतो. आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पोटनिवडणुकीत मी सर्व मतदारांचे आभार मानतो. मला आशा आहे की भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेईल, तरुणांना रोजगार देईल, महिलांचा आदर आणि सुरक्षा राखेल.’ कमलनाथ यांनी पुढे असे लिहिले आहे की, ‘आमचे भाजपा (शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार) राज्याच्या नव निर्माणासाठी कार्य करून राज्याला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर नेईल. आम्ही जनादेश स्वीकारून विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडू. राज्य आणि लोकांच्या हितासाठी सदैव उभे राहू.’

भाजपा आणि कॉंग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातील संबंधानंतर सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी 21 जागांवर जोरदार विजय मिळविला. त्याचवेळी, सिंधिया आणि त्यांचे समर्थक आमदार गमावलेल्या कॉंग्रेसला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागेल.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी फोनवर चर्चा केली. मध्य प्रदेशात भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान व केंद्रीय नेतृत्व यांचे आभार मानले. (हेही वाचा: Bihar Election Results 2020: RJD नेता तेजप्रताप यादव हासनपूर मतदार संघातून विजयी)

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये एनडीएला फायदा होताना दिसत आहे. त्याचबरोबर 11 राज्यांमधील 59 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचीच झोळी यशस्वी ठरली आहे. भाजपने 59 पैकी 40 विधानसभा जागा जिंकल्या आहेत आणि विरोधकांना पुन्हा त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. पक्षाने तेलंगणात एक जागा, कर्नाटकात दोन, मणिपूरमध्ये चार, उत्तर प्रदेशात सहा, गुजरातमध्ये आठ आणि मध्य प्रदेशात 21 जागा जिंकल्या आहेत.