मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका माकडाने (Wild Monkey) तब्बल 1 लाख रुपये पळवून नेले आहेत. जबलपूर जिल्ह्यात एक रिक्षा एका अरुंद रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकली होती आणि त्यात बसलेल्या प्रवाशाजवळ 1 लाख रुपये टॉवेलमध्ये गुंडाळले होते. ट्राफिकदरम्यान जंगली माकडाने ते पळवून नेले. मझोली पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन सिंह यांनी रविवारी सांगितले की, ही रोकड घेऊन त्याचा मालक मोहम्मद अली इतर दोन लोकांसह ऑटो रिक्षातून प्रवास करीत असताना, ही घटना 30 सप्टेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान रस्त्यावर प्रचंड ट्राफिक लागले होते. या रहदारीचे नक्की कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी रिक्षामधून तीनही प्रवासी खाली उतरले. ते वाहनातून बाहेर येताच, माकड रिक्षामध्ये ठेवलेला टॉवेल घेऊन पळून गेले, ज्यामध्ये एक लाख रुपये गुंडाळून ठेवले होते. नंतर काही अंतर गेल्यावर माकड झाडावर चढले आणि त्याने टॉवेल हलवायला सुरुवात केली. त्याबरोबर वरून नोटांचा पाऊस सुरु झाला. नोटा खाली पडल्या आणि इतःस्तत विखुरल्या. यामध्ये मालक फक्त 56,000 रुपये गोळा करण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित पैसे त्याने गमावले. (हेही वाचा: Delhi Murder: उसने घेतलेले 300 रुपये परत न केल्याने एकाची हत्या, दिल्लीच्या आनंद पर्वत परिसरात खळबळ)
सिंह यांनी सांगितले की, उर्वरित पैसे कुठे गेले हे माहित नाही. हे एक जंगली माकड असल्याने या घटनेसंदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच पुढील तपासासाठी वस्तुस्थिती तपासण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या भागात लोक अनेकदा माकडांना खाऊ घालतात आणि अनेक माकडे वाहनांमध्येही शिरतात.