मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अनुपपूर (Anuppur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 7 वर्षाच्या निष्पाप मुलीचा साडीसोबत खेळताना मृत्यू झाला आहे. साडीशी खेळताना चुकून या मुलीला गळफास लागला व त्यात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. ही घटना पकारिया गावात सोमवारी घडली जेव्हा मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती, तर तिची आई आत काम करत होती.
पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी अनुपपूर जिल्ह्यात सात वर्षांची मुलगी साडीच्या तुकड्याशी खेळत होती. याच खेळात चुकून साडीचा फास लागल्याने मुलीचा मृत्यू झाला.
कोतमा स्टेशन प्रभारी अजय बेगा यांनी सांगितले की, पकारिया गावात सोमवारी ही घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घराच्या बाहेरील भिंतीला लावलेल्या बांबूला बांधलेल्या साडीच्या तुकड्याशी खेळत असताना, मुलीने चुकून ती गळ्यात बांधली होती. त्यानंतर कुटुंबीयांना मुलगी या साडीला लटकलेली आढळून आली. तिला ताबडतोब कोतमा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा: Chandigarh Crime: मद्यधुंद अवस्थेत तरूणांचा सुरू होता धिंगाणा, थांबवण्यास गेलेल्या पोलिसाला मारहाण)
दरम्यान, याआधी नागपूर येथे मोबाईल अॅपमधील गेम पाहून एका मुलाने गम्मत म्हणून गळ्यात फास अडकवला होता. या खेळात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा मुलगा 8 वीच्या वर्गात शिकत होता. हा मुलगा मोबाईलवर विविध गेम्सचे अॅप डाउनलोड करून पाहत असे. त्यातीलच एक असा गेम आहे, ज्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून गळ्यातील फास सोडवण्याची क्रिया दाखवण्यात आली होती. हा मुलगा अनेकदा हा गेम पाहत होता. हाच गेम पाहून त्याने स्वतःच्या गळ्यास फास अडकवला व त्यात त्याचा मृत्यू झाला.