Maa Saraswati (संग्रगीत संपादित प्रतिमा)

राजस्थानचे (Rajasthan) शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत माता सरस्वतीची (Maa Saraswati) मूर्ती बसवण्याचे आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये माँ सरस्वतीची मूर्ती बसवणे बंधनकारक असून, ही मूर्ती शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे वय आणि लिंग लक्षात घेऊन हा ड्रेस कोड निश्चित केला जाईल.

शाळेतील सद्यस्थितीची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले. शाळांमध्ये धर्मांतर होऊ देणार नाही, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. ज्या शाळेत माँ सरस्वतीची मूर्ती नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

याआधी राजस्थान सरकारचे मंत्री किरोडीलाल मीणा यांनी मुस्लिम विद्यार्थिनींना शाळांमध्ये हिजाब घालण्यास विरोध केला होता. ते म्हणाले होते, ‘अनेक देशांमध्ये हिजाबवर बंदी आहे, त्यामुळे येथेही हिजाबवर बंदी घातली पाहिजे. शिस्तीसाठी सर्वांनी एकाच पोशाखात शाळेत येणे आवश्यक आहे.’

नुकतेच जयपूरच्या गंगापोल भागात असलेल्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी आरोप केला होता की, त्यांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात हवामहलचे आमदार बालमुकुंद आचार्य यांना बोलावण्यात आले होते. मुस्लिम विद्यार्थिनींचा आरोप आहे की, भाजप आमदार शाळेत आले आणि हिजाबबद्दल बोलले आणि यावेळी धार्मिक घोषणाही दिल्या. यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी शाळेबाहेर निदर्शने केली. (हेही वाचा: Surya Namaskar Compulsory In School: राजस्थानमध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य; शिक्षण विभागाने जारी केला आदेश)

हा मुद्दा काँग्रेसचे आमदार रफिक खान यांनी विधानसभेतही उपस्थित केला होता. यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. यावर बालमुकुंद आचार्य म्हणाले की, मुलींना 'भारत माता की जय', ‘सरस्वती माता की जय’ म्हणण्यास सांगितले, यात काय चुकीचे आहे? बालमुकुंद आचार्य पुढे म्हणाले, ‘मला शाळेत दोन प्रकारचे ड्रेस कोड दिसले. एक हिजाब मध्ये आणि एक हिजाब शिवाय. उद्या आमच्या मुलांनी लेहेंगा-चुन्नी किंवा वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातले तर चालेल का?’