Rahul Gandhi (फोटो सौजन्य - X)

Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. वांद्रे पूर्व येथे त्यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यापैकी त्यांना दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. या घटनेबाबत विरोधक सरकारवर हल्लाबोल करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'बाबा सिद्दीकी जी यांचे दुःखद निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं अधोरेखित होतं. सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे.' (हेही वाचा - Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'वरून विरोधकांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा)

राहुल गांधी यांची एक्स पोस्ट - 

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे की, 'एकाच दिवशी दोन मृत्यूची भयंकर बातमी. बाबा सिद्दीकीची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. हे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती दर्शवते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांबद्दल माझ्या संवेदना. प्रो. साईबाबांचा मृत्यूही चिंताजनक आहे. त्याचा मृत्यू देखील अंशतः UAPA चा परिणाम होता, ज्यामुळे पोलिसांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्हाला दीर्घकाळ तुरुंगात ठेवता येते.'

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया - 

दोषींवर कडक कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री शिंदे

तथापी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. बाबा सिद्दीकी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला. सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या, त्यानंतर त्यांना वाई श्रेणीची सुरक्षाही देण्यात आली होती.