Lalu Prasad Yadav | (Photo Credits: Facebook)

चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल आहे. आता त्यांचा उपचार करत असलेले डॉक्टर उमेश प्रसाद (Dr Umesh Prasad) यांनी मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. डॉ. उमेश प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार लालू प्रसाद यादव यांची किडनी (Kidney) फक्त 25 टक्केच कार्यरत आहे. अशा परिस्थितीत, पुढील दिवसांमध्ये त्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. लालूप्रसाद यादव यांना मधुमेह आणि मूत्रपिंडाचा आजार आहे. डॉ. उमेश प्रसाद म्हणाले की, यादव यांच्या मूत्रपिंडाचे कार्य कधी बिघडेल हे सांगणे कठीण आहे. त्यांची स्थिती ठीक नाही आणि त्यांनी हे सर्व लिखित स्वरूपात अधिकाऱ्यांना दिले आहे.

लालू प्रसाद यादव यांचे मूत्रपिंड फक्त 25 टक्केच कार्यरत आहे, अशी माहिती उमेश प्रसाद यांनी शनिवारी एएनआयला दिली. ही परिस्थिती चिंताजनक आहे कारण अशावेळी त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य अचानक थांबू शकते. हे येत्या 2-4 महिन्यांत होऊ शकते, मात्र कधी ते अचूक सांगणे अवघड असल्याचे डॉक्टर म्हणाले. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास त्यांना डायलिसिस घेण्याची आवश्यकता भासू शकते.

डॉक्टर पुढे म्हणाले, ज्या वेगाने त्यांचा आजार वाढत आहे ते चिंताजनक आहे. त्यांना 20 वर्षांपासून मधुमेहदेखील आहे, त्यामुळे आतल्या अवयवाचे नुकसान होण्यास आधीच सुरुवात झाली आहे. आत्ता त्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. (हेही वाचा: Covaxin लस घेऊनही कोविड-19 ची बाधा झालेले हरियाणाचे गृहमंत्री Anil Vij यांनी लसीबद्दल दिली 'ही' महत्त्वपूर्ण माहिती)

दरम्यान, लालू प्रसाद यादव 2017 पासून तुरूंगात आहेत. मात्र, चारा घोटाळ्यांमधील एका प्रकरणात सोडून इतर सर्व प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. अलीकडेच कोर्टाने या प्रकरणातील सुनावणी 6 आठवड्यांसाठी तहकूब केली होती.  शिक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. मात्र आरजेडीचे म्हणणे आहे की, सीबीआय मुद्दाम कोर्टात उशीर करीत आहे.