Kerala: विषारी कोब्रा आणि महिलेच्या डमीसोबत पोलिसांनी रिक्रिएट केला उत्तरा हत्या प्रकरणातील सीन; समोर आले हे सत्य
King Cobra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

केरळ पोलिसांनी (Kerala Police) विषारी कोब्रा (Cobra) आणि डमीच्या मदतीने प्रसिद्ध उत्तरा हत्या प्रकरणातील क्राइम सीन रिक्रिएट केला. गेल्या वर्षी 7 मे रोजी उत्तराचा कोब्राच्या चाव्यामुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी ही हत्या समजून या प्रकरणात तिचा पती सूरज याला अटक केली होती. सुरजला ज्या व्यक्तीने हा साप विकला होता त्यालाही पोलिसांनी अटक केली होती. सूरजने यापूर्वीही आपल्या पत्नीला सापाच्या मदतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. केरळ पोलिसांनी या क्राईम सीनचा रिक्रिएशनचा व्हिडिओ जारी केला आहे.

यामध्ये तज्ज्ञांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कोब्रा स्वतःहून कोणावरही हल्ला करत नाही. यासाठी, त्याला चिथवावे लागते. या व्यतिरिक्त, एक्‍सपर्टनी हेदेखील पाहिले की, कोब्राचे आपल्या शिकारवर हल्ला केल्यानंतरचे दातांचे व्रण आणि त्याला उकसावल्यानंतर त्याने केलेल्या हल्ल्यातील दाताचे व्रण वेगवेगळे असतात. आता या प्रकरणात ही माहिती महत्त्वाची सिद्ध होईल.

गेल्या वर्षी, कोल्लम जिल्ह्यातील अंचल परिसरातील आपल्या आई-वडिलांच्या घरी उत्तराचा मृत्यू झाला होता. तिला कोब्रा चावला होता व तो सापही तिच्या खोलीत सापडला होता. पुढे तिचे शवविच्छेदनही झाले. तपासादरम्यान, पोलिसांना समजले की, काही महिन्यांपूर्वी उत्तराला सापाने चावा घेतला होता. यानंतर ती गंभीर आजारी पडली होती आणि बरे होण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे आली होती. (हेही वाचा: Odisha: विहिरीत मिळाली तब्बल कोब्रा सापाची 15 पिल्लं, गावातील लोक हे दृष्य पाहून झाले हैराण)

या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती सूरजची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, त्याला दोन्ही साप सुरेश नावाच्या व्यक्तीने पुरवले होते. नंतर सुरेश पोलिसांचा साक्षीदार बनला. सूरजला त्याची पत्नी उत्तरापासून काहीही करून सुटका करून घ्यायची होती आणि त्यासाठी त्याने इंटरनेटवर सापांबाबत माहिती गोळा केली. सध्या सूरजचे आई-वडील आणि बहीण यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. उत्तराच्या हत्येत सुरजची मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.