Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

केरळमधील (Kerala) पेरुंबवूर (Perumbavoor) येथील एका मदरशाच्या (Madrasa) शिक्षकाला 11 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पेरुंबवूर येथील POCSO न्यायालयाने मदरसा शिक्षक अलियारला एकूण 67 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 65 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. परंतु दोषी अलियारला केवळ 20 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल कारण या प्रकरणातील अनेक शिक्षा एकाच वेळी चालतील. मुलावरील लैंगिक घटना जानेवारी 2020 मध्ये थडियट्टापरंबू पोलीस स्टेशन हद्दीतील एका मदरशात घडली.

अलियारने मदरशाच्या खोलीत मुलावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले आणि फोन देऊन पॉर्न व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले. मुलाने हा प्रकार त्याच्या मित्रांना सांगितला व नंतर मित्रांनी वर्ग शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. वर्ग शिक्षक मुख्याध्यापकांशी बोलल्यानंतर बालकल्याण समिती आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मुलाने दिलेल्या जबानीनुसार, तो सकाळी मदरशात प्रशिक्षण घेण्यासाठी जात असे, मात्र बऱ्याच दिवसांपासून अलियार हा त्याला संध्याकाळी फोन करून बोलावत असे आणि लैंगिक अत्याचार करत असे. तो मुलाला खोलीत नेऊन ओरल सेक्ससाठी जबरदस्ती करायचा. यासोबतच तोंड बंद ठेवण्यासाठी मिठाई द्यायचा आणि याबद्दल कोणाला सांगितल्यास परीक्षेत नापास करेन, अशी धमकीही द्यायचा.

एसएसपीने सांगितले की, अलियारने मुलाला अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाइलही दिला होता. मुलाच्या वडिलांनी तो पहिला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी तो तोडून टाकला. तोपर्यंत त्यांना याची माहिती नव्हती. जेव्हा बालकल्याण समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याच्या आधारावर 19 जानेवारी 2020 रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत अलियारला अटक करण्यात आली, तेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. (हेही वाचा: नापास करण्याची धमकी देऊन तीन विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न, शिक्षकावर कारवाई करण्याची कुटूंबियांची मागणी)

यानंतर न्यायालयाने अलियारला या प्रकरणात दोषी ठरवले आणि अलियारला विविध कलमे जोडून 67 वर्षांची शिक्षा सुनावली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुलाने आपल्या निवेदनामध्ये सांगितले की मदरसा शिक्षक अलियारने इतर मुलांसोबतही असेच कृत्य केले होते, मात्र कोणीही तक्रार दाखल केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अलीयारला लवकरच वियुर तुरुंगात हलवण्यात येणार आहे.