Kedarnath Temple Reopen Date: महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या कधीपासून घेऊ शकाल दर्शन
Kedarnath Dham

Kedarnath Temple Reopen Date: तुम्हीही केदारनाथला जाण्याच्या तयारीत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर जगप्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टने 12 वे ज्योतिर्लिंग बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची शुभ तारीख 10 मे असल्याचे सांगितले आहे. येत्या 10 मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे पूर्ण विधीपूर्वक उघडले जातील. त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून दरवाजे उघडल्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. बर्फवृष्टीमुळे केदारनाथचे दरवाजे वर्षातील सहा महिने बंद असतात.

भगवान केदारनाथचे दरवाजे 6 मे पासून उघडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 6 मे रोजी ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून बाबा केदार यांची फिरती मूर्ती गुप्तकाशीला पोहोचेल. 7 मे रोजी रामपूरला पोहोचेल, त्यानंतर 8 मे रोजी गौरीकुंड आणि 9 मे रोजी केदारनाथ धाम येथे विराजमान होईल.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची परंपरा आहे. यासह गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे उघडण्याचा शुभ मुहूर्त चैत्र नवरात्री आणि यमुना जयंतीच्या प्रतिपदेला ठरवला जाईल. याआधी बसंत पंचमीला भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यात असे म्हटले होते की, यावेळी 12 मे रोजी सकाळी बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात येतील. (हेही वाचा: Police Officer Kicks Man Offering Namaz On Road: रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याने लाखाने मारले, पहा व्हिडिओ)

केदारनाथ हे पंच केदारांपैकी पहिले आहे. केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. पौराणिक मान्यतेनुसार, महाभारत युद्धानंतर पांडव त्यांची पत्नी द्रौपदीसह हिमालयात पोहोचले जेथे त्यांनी, त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी केदारनाथ मंदिर बांधले. यानंतर त्यांनी आपल्या पूर्वजांसाठी येथे प्रार्थना केली. त्यानंतरच त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. असे म्हणतात की, ज्या दिवशी पांडवांनी त्यांच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते तो दिवस भाऊबीजेचा होता, त्यामुळे या दिवशी केदारनाथचे दरवाजे बंद होऊ लागले.