Kedarnath Dham: मुंबईतील व्यावसायिकाने केदारनाथ धामला दान केले 230 किलो सोने; मंदिराच्या भिंती सुवर्णाने उजळल्या
Kedarnath Temple (Photo Credits: Wikimedia Commons)

जगप्रसिद्ध श्री केदारनाथ मंदिराच्या (Kedarnath Dham Temple) गर्भगृहात आता तुम्हाला सोन्याची भिंत दिसेल. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ मंदिरातील गर्भगृहाच्या भिंती सोन्याने मढवण्यात आल्या.  येथे येणाऱ्या भाविकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. मुंबईतील एका व्यावसायिकाने या भिंतीसाठी सुमारे 230 किलो सोने दान केले आहे. पूर्वी केदारनाथ मंदिराला चांदीचा मुलामा असलेली भिंत होती. मात्र, आता त्याची जागा सोन्याच्या पत्र्याने घेतली आहे.

या सोन्याच्या पत्र्यावर शंख, त्रिशूल, डमरू कोरलेले आहेत. याशिवाय त्यावर जय बाबा केदार, हर हर महादेव असे लिहिलेले आहे. मंदिराच्या मुख्य भागात उभी असलेली ही 230 किलो सोन्याची भिंत मुंबईतील एका व्यावसायिकाने दान केली आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त भिंतीला सोन्याचा मुलामा चढवण्यात आला. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ मंदिरातील गर्भगृहाच्या भिंतींवर चांदीऐवजी सोन्याचे थर चढवण्याची परवानगी दिली होती.

मात्र, याआधी स्थानिक धर्मगुरूंनी या निर्णयाला विरोध केला. मंदिराच्या गर्भगृहाच्या पौराणिक परंपरेला हा धक्का असल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक पुजाऱ्यांनी सोने हे संपत्ती आणि ऐहिक सुखाचे प्रतीक आहे आणि मंदिराच्या प्राचीन मूल्यांच्याही विरोधात असल्याचे सांगत या निर्णयाला विरोध केला होता. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंड सरकारची परवानगी मिळाल्यानंतर गर्भगृहाच्या चार भिंतींवरील चांदीचे अस्तर हटवण्यात आले व सोन्याचे चढवले गेले. (हेही वाचा: Ayodhya Deepotsav 2022: अयोध्येच्या दीपोत्सवात 15 लाख दिवे प्रज्वलित; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (See Photos and Videos)

सोन्याचे थर अर्पण करताना कोणत्याही परंपरा किंवा धार्मिक श्रद्धेला तडा गेला नसल्याचे समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे. मंदिराला 230 किलो सोने दान करताना गाभाऱ्याच्या भिंती सोन्याने सजवलेल्या पाहण्याची खूप दिवसांपासून इच्छा असल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले. 2017 मध्ये गर्भगृहाच्या भिंती चांदीने मढवल्या गेल्या होत्या. यासाठी किलो चांदी वापरली गेली. त्यानुसार भिंतीला सोन्याने झाकण्यासाठी तेवढेच सोने लागले, ज्याची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे.