Next CJI: भारताच्या 49 व्या सरन्यायाधीश पदी मराठी चेहरा; NV Ramana यांच्याकडून  न्यायमूर्ती Uday  Lalit  यांच्या नावाची शिफारस
उदय लळीत । PC: AIR News Mumbai

भारताचे सरन्यायाधीश एन वी रमण्णा (NV Ramana) यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट दिवशी संपणार आहे. त्यानंतर देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी उदय लळीत (Uday Umesh Lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे. मराठमोळे उदय लळीत भारताचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) असणार आहेत. 27 ऑगस्ट दिवशी ते सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध होणार आहेत.

लळीत यांचा सरान्यायाधीश म्हणून तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीचा कार्यकाळ असणार आहे. न्यायमूर्ती एस.एम. सिक्री यांच्यानंतर थेट बारमधून झालेले ते दुसरे न्यायाधीश आहेत जे पुढे सरन्यायाधीश बनणार आहेत. सिक्री हे 1971 ते 1973 दरम्यान सरन्यायाधीश होते. लळीत यांची ऑगस्ट 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कोण आहेत न्यायमूर्ती लळीत?

  • 49 व्या सरन्यायाधीश पदी विराजमान होणार्‍या न्यायमूर्ती लळीत यांचं नाव उदय उमेश लळीत आहे.
  • उदय लळीत हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे.
  • उदय लळीत यांचे आजोबा, वडील दोघेही वकील होते. आजोबा वकीली साठी सोलापूरला आले आणि स्थायिक झाले.
  • उमेश लळीत हे आगामी सरन्यायाधीशांचे वडील 1974-76 मध्ये हायकोर्टात न्यायमूर्ती होते.
  • उदय लळीत यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे.
  • 1983 मध्ये वकील म्हणून वकिली क्षेत्रात सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील प्रोफाइलनुसार, 1985 च्या अखेरीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात कायद्याचा सराव केला.
  • जानेवारी 1986 मध्ये लळीत यांनी आपली प्रॅक्टिस दिल्लीला सुरू केली आणि एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले. ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य देखील होते.

न्यायमूर्ती लळीत यांच्यानंतर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे देशाच्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. त्यांचे वडील न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड हे देखील CJI राहिले आहे. वाय.व्ही. चंद्रचूड यांनी 1978 ते 1985 या सात वर्षांच्या कार्यकाळासह आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.